कविता कट्टा

            


               शब्द पावसात भिजले

शब्द पावसात भिजले
मृदगंध लेवूनि नाहले
गंधानी त्या हरखून गेले
कागदावरी उतरण्यास आतूर जाहले।।
      शब्द पावसात भिजले

शब्दांना अंकुर फुटले
बीजातून नवकाव्य स्फूरले
पानो-पानी शब्द बहरले
शब्दांना सूर-गंध लाभले।।
     शब्द पावसात भिजले

कधी शब्द गझल जाहले
कधी भक्ती रसात डुंबले
कधी हृदयातूनी हृदयी अलवार झाले
कधी विरह बनूनी नेञांतूनी पाझरले।।
     शब्द पावसात भिजले

पाऊस धरती अन् शब्द
ञिभूवनी अमर जाहले
शब्द नाद ब्रम्ह पावले
शब्द नाद ब्रम्ह पावले।।
     शब्द पावसात भिजले

( सौ. रेश्मा रविंद्र मेहता )

                


=======================================================================



    ये जीवलगा... 

ये जीवलगा.. ये मनमीता 
ये राजसा.. ये ममप्रीता 
कळेना जुळला  कैसा 
ऋणानुबंध आपला ऐसा ... 

रेशीमबंध तव नात्यात 
वीण प्रीतीची गेले विणत 
घट्ट या प्रीतधाग्यात 
गेली मी कैसी गुंतत?...

 बाहुपाशात तुझ्या निर्धास्त
 संरक्षण तुझ्या विळख्यात 
 विरघळूनी जाता  स्पर्शात 
घेते सामावून तुजला श्वासात... 

जीव गुंतला तुझ्यात 
ध्यास तुझाच दिनरात 
चिरंतन आपलं नातं 
शरीर मी - तू प्राणज्योत... 

उतरला प्रीतीचा अर्थ सत्यात 
लाभला तू मला मी भाग्यवंत 
अंतरीची भावना मांडते कवितेत 
जाहली सफल आज माझी प्रीत... 

... सौ. गीता विश्वास केदारे..

                        
                 
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------
        
                     आला दिवस सुखाचा...!

काय आलो घेउनी, काय नेणार आहे!
रिक्त हाताने मी, सरणावर जळणार आहे.
**
माझ्या मलाच ठावूक, सोशिल्या वेदना किती
घाव सुगंधी फुलांचे, मी सोसणार आहे
**
थेंबा थेंबात हा जळतो पाऊस दारी
रक्त भरल्या जखमांनी मी विझणार आहे
**
का तुझ्या आठवनींनी छळले मला हे
नसता तू समीप तरीही गजरा फुलणार आहे
**
नाचेन आनंदे चंद्रभागेच्या काठावरी
वाळवंटी वारकरी होवून मी नाचणार आहें
**
सोडून दे रे वेदना वंचना त्या कालच्या
आला दिवस सुखाचा समजून मी  जगणार आहे
**
प्रकाश साळवी

              गझल 

पोपट म्हणे समजू नका डाळिंब असल्यासारखे
कैदेत अमृतही मला कडुनिंब असल्यासारखे 
.

शोधात आहे याच तर प्रत्येक इथला आरसा
मिळणार का? माझे कुणी प्रतिबिंब असल्यासारखे
.

ब्रह्मांडही व्यापून घेते पोकळी माझ्यातली
येथे जरी अस्तित्व माझे टिंब असल्यासारखे
.

बरसात प्रेमाची तिच्या बरसून गेली एकदा 
अन् आजही आयुष्य ओलेचिंब असल्यासारखे
.

लावून चष्मा चाचपत असते नजर काहीतरी
म्हातारपण जणु भंगलेले बिंब असल्यासारखे
.
......................निलेश कवडे  अकोला
                
               



चढाओढ (मुक्तछंद)

दारिद्रय रेषेच्या गर्तेत
खितपत पडलेल्या जीवांना
उभारी देण्यासाठी
अहोरात्र झटणारा माझा जीव
आज पुरता खंगून गेलाय
हवंच तर कंकाळ म्हणा.......

अस्थिपंजर देहाकडे पाहून
समजून येईल
त्यामागच्या कष्टांचे मोल व सोसीकता
आणि आज
लाज वाटते आमच्या औलादींना
अभिमानाने बाप म्हणायची.........

मरणासन्न अवस्थेतील
निर्जीव देहातून जेंव्हा
अखेरचा श्वास निघून जातो
तेंव्हा त्याचे अस्तित्व 
कायमचे मिटविण्यासाठी सुरू होते
फक्त चढाओढ, चढाओढ आणि चढाओढ.



           रत्नाकर जोशी जिंतूर

=====================================================================



उनसावल्यांचा खेळ करणारा
पाऊस मला आवडतो
जो सुखदुःखांची  पेरणी करत
जीवन आपले घडवतो....

 असा कसा रे तू
तुझीच आम्हा आस रे,
तहानलेली लेकरासाठी 
ओसंडू दे तुझी कास रे....

गरीबीत असतांना मला 
उन्हाळा जवळचा वाटे,
आता हिरवळ पेरणारा
पाऊस आठवणीत दाटे.....

उन,वारा ,पाऊस 
मायने किती सोसलं,
फाटकं लुगडं,खोल पोट
पोरगं मात्र तिनं पोसलं...

तू जवळ असतेस तेव्हा 
मन शांत करतो गार वारा,
आठवणींचा वर्षावाने
तृप्त करतात पावसाच्या धारा.



....हंसराज 
------------------------------------------------------------------------------------------------------------------

डोळ्यात ,पहिल्या
 सारखं प्रेमच दिसत नाही,
मी पाहत राहतो एक टक तुला
तुला सेल्फी शिवाय काही सुचतच नाही

 तु केला इशारा हळूच जाता जाता
जागेपणी ही माझी झोप उडाली ना आता

 अलवार हरवत जाते तुझ्यात
स्वतःला शोधावे लागते इतपत
माझे मला माझ्यात....

तुझ्यावर प्रेम करण्याचा 
छंद मला जडला
तु हो म्हण किंवा नाही
तुझा मोह ना टाळला

पावसाची सर येते
पण तु येत नाहीस
मी वाट पाहते
पण तु भेटत नाहीस

कविता शिंदे

=========================================================================


मी खुशाल आहे

नकोस माझी करू काळजी जिथे जसा मी खुशाल आहे
तुझ्याविनाही जिवंत कैसा? मलाच माझा सवाल आहे

जाता जाता भेट दिली का भळभळणार्‍या जखमांची तू
रोज सोसतो तिव्र वेदना, उपाय त्याहुन जहाल आहे

वाट दाखऊ कशी कुणाला? मीच असा हा भरकटलेला
काय फायदा? हाती माझ्या अंधाराची मशाल आहे

पिऊन प्याल्यावरती प्याले रात्र रात्र मी जागत असतो
दिवाळखोरी घरात आली, अमीर झाला कलाल आहे

पैसे देउन तुझी ईश्वरा यथासांग मी पुजा बांधली
भटजीचे वागणे असे की जणू तझा तो दलाल आहे

जरी एकटा भणंग आहे, करू नको काळजी जराही
आई! तुझिया आठवणींची पांघरली मी दुशाल आहे

आज इथे तर तिथे उद्याला, स्थैर्य काय ते मला न ठावे
सैलानी मी मस्त कलंदर विश्व केवढे विशाल आहे !

योग्य वाटले तसेच जगलो, पाप पुण्य हा विचार नव्हता
स्वर्ग मिळो की नर्क शेवटी कुणी पाहिला निकाल आहे

बा "निशिकांता"  खूप अपेक्षा प्रेमामध्ये कधी नसाव्या
तिच्या सोबती झोपडीतही अनुभवला मी महाल आहे


निशिकांत देशपांडे.

---------------------------------------------------------------------------------------------------------



~ रंग ~ 

तो रंग प्रितीचा गुलाबी
डोळ्यांत अजूनही ओला
मिटताच नेत्र हे माझे
आठवती त्या लाघव वेळा....
बहरण्याचे दिवस ते हिरवे
सप्तरंगात जणू भिजलेले
कळ्यांची फुले होताना
जणू क्षणंही ते थिजलेले....
त्या नीलवर्णी आकाशी
विहरत होती प्रीती
श्वेत रविकिरणांनी
गुंफली होती नाती....
लाल गुलाब फुलले होते
गालांवर सोन सकाळी
रक्तवर्णी ओठही झाले
तू चुंबताच भाळी....
तो रंग मैत्रीचा पिवळा
होताच सजला गात्री
सप्तरंग गवसले त्याला
प्रीत बहरता नेत्री....
रंगण्या तुझ्याच रंगी
मी आतुर झाले होते
मीलनाचे सुंदर क्षण ते
डोळ्यात साठवित होते...
जीवनात ऐसे आपुल्या
नवरंग बरसले होते
पण भान हरपूनी मी
रंग काळा विसरले होते....
बघता बघता गडद ते रंग
फिकटचं होत गेले
नजर जणू लागली त्यांना
मग विस्कटतच गेले....
आता ते नाजूक रंग 
आठवातच माझ्या ओले
अंधारी काळ्या रात्री
पापण्यात लपवले सारे....
आठवांतही नकोत आता
ते विटके फिकट रंग
मिसळता रंग हा काळा
सजतील पुन्हा नवरंग....
रंगांसंगे खेळेन नव्याने
माझ्याच शब्दसुमनांनी
सप्तरंगी होईल पुन्हा मग
माझीही विफल कहाणी......



~ अश्विनी ~


============================================================



“ लेकीचं करा स्वागत “


कुलदीपक,  कुलदीपक
   कितीही वाजवा डंका
त्यात ज्योती तेवल्याविना
   प्रकाश कधी पडेल का?... १…

आईशिवाय सांगा तुम्हाला
   जगी अस्तित्व  लाभेल का?
स्त्री शिवाय जगात सांगा
   झाडाचे पान तरी हलते का   ... २...


आई हवी,  बहिणही हवी
   प्रेयसी आणि  पत्नीही हवी
लेकीलाच  नाकारल्यावर
   हे सारं काही  लाभेल का?... ३...


कितीही  नाती असोत जगात
   लेकीच्या प्रेमाची सर येईल का?
लेकीचं स्वागत करा प्रेमानं
   जीवनाचं साफल्य लाभेल बरं का..४..


हुंड्यासारख्या घातक रुढींमुळे
   कन्येचा घेतला अवघ्यांनी धसका
सा-या असल्या रुढींना नाकारणं
   तुमच्याच हातात आहे  बरं का… ५…


स्त्रीभ्रूण हत्या नका करु
   आणि पापाचे धनी होऊ नका
कन्या तुमची तुमच्या किर्तीचा
   जगात वाजवेल नक्कीच डंका…६..


         सुनीता सुरेश महाबळ


===================================================================


____शब्दसरिता___


तुझ्यावर लिहिताना 
शब्दच नाही सुचत 
शब्दांच्या जाळ्यात तूला 
गुंतवू नाही शकत ... 

शब्दासारखे सोज्वळ 
सौंदर्य तुझे देखणे 
शब्दातीत होतो व्यक्त 
लिहून गझल गाणे... 

टपोरे अक्षर जणू 
काळेभोर डोळे तुझे 
चाफेकळी नाकामध्ये 
खड्यांची बुगडी शोभे.... 

लालेलाल ओष्ठ तुझे 
गुलाबाच्या पाकळ्यांच 
मदमस्त होतो असा 
गुंतत जातो तुझ्यात... 

तू सखी रुपगर्विता 
तू मोहक ममप्रीता 
तू संथ शब्दसरिता 
तू माझी प्रेमकविता... 


... सौ. गीता विश्वास केदारे...


==================================================================


पावसाची सर...

उन्हात तापलेल्या मातीला अन 
भेगाळलेल्या जमिनीला 
हवी आहे एक पावसाची सर

वहावयाचा आहे पूर
अन्तःकरणातल्या आपुलकीचा
अन हिरव्यागार मायेचा

ल्यायची आहे हिरवी साडी
बांधायची आहे वेलिंची माडी
करायचा आहे अंगभर शृंगार
इवल्या इवल्या रानफूलांचा

द्यायचा आहे जन्म धान्यांकुरांना खास
आनंद भरल्या नेत्रांनी पहायची आहे
मोती पोवळयांची रास

फुलवायचा आहे फाटका संसार
तिची अविरत सेवा करणाऱ्या
कष्टकरी शेतकरी लेकराचा

भरवायचा आहे पोटभर घास
अर्धपोटी असलेल्या 
त्याच्या घर धणीनिला

गायची आहे अंगाई...
गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या करणाऱ्या
बाळ गोपाळांना

येणाऱ्या लग्नसराईत
उडवायचा आहे बार
न्हात्या धुत्या लेकिच्या लग्नाचा

रचली अहेत मनोराज्य 
अगणित आहेत स्वप्न
पण ...

मेघराजा तू बरसला नाहीस लवकर 
तर सर्व रहतील 
अधुरी अपूर्ण

लवकर ये मेघराजा वाट पाहतीये धरती राणी
विरहाच्या आगीत होरपळून
तिहि करतेय पाणी पाणी

शुभांगी देशमुख ..


=====================================================================


ज्या क्षणाला 'मी' पणाचा अस्त होतो..
त्या क्षणी माणूस मग संन्यस्त होतो..

जसजसे नापास करतो जीवना तू..
तसतसा मी आणखी अभ्यस्त होतो..

फक्त दुष्काळामुळे थोडाच जळतो?
जास्त पाण्याने मळा उद्ध्वस्त होतो..

काय खोटे?..दैव,बी की शेत माझे?..
माल मी जो काढतो तो स्वस्त होतो..

कोणती जादू तुला येते?..कळू दे..
भेटतो जो..तो तुझ्या अधिनस्त होतो..

प्रेम ही एकच अशी लागण असावी..
जो हिच्याने ग्रस्त होतो..त्रस्त होतो..


संतोष वि.कांबळे

--------------------------------------------------------------
चारोळ्या

 उनसावल्यांचा खेळ करणारा
पाऊस मला आवडतो, 
जो सुखदुःखांची  पेरणी करत
जीवन आपले घडवतो....
....हंसराज

गरीबीत असतांना मला 
उन्हाळा जवळचा वाटे,
आता हिरवळ पेरणारा
पाऊस आठवणीत दाटे.....
......हंसराज

 असा कसा रे तू
तुझीच आम्हा आस रे,
तहानलेली लेकरासाठी 
ओसंडू दे तुझी कास रे....
....हंसराज

उन,वारा ,पाऊस 
मायने किती सोसलं,
फाटकं लुगडं,खोल पोट
पोरगं मात्र तिनं पोसलं...
...हंसराज

तू जवळ असतेस तेव्हा 

मन शांत करतो गार वारा,
आठवणींचा वर्षावाने
तृप्त करतात पावसाच्या धारा.
....हंसराज

--------------------------------------------------------

चारोळ्या

तुझ्या डोळ्यात ,पहिल्या
 सारखं प्रेमच दिसत नाही,
मी पाहत राहतो एक टक तुला
तुला सेल्फी शिवाय काही सुचतच नाही

कविता शिंदे


 तु केला इशारा हळूच जाता जाता
जागेपणी ही माझी झोप उडाली ना आता

कविता शिंदे


 अलवार हरवत जाते तुझ्यात
स्वतःला शोधावे लागते इतपत
माझे मला माझ्यात....

 तुझ्यावर प्रेम करण्याचा 

छंद मला जडला
तु हो म्हण किंवा नाही
तुझा मोह ना टाळला

कविता शिंदे


 पावसाची सर येते

पण तु येत नाहीस
मी वाट पाहते
पण तु भेटत नाहीस


कविता शिंदे

-------------------------------------------------------------








11 comments:

  1. सुरेख कविता शुभांगी

    ReplyDelete
  2. अत्यंत सुरेख कविता।दोन्ही विजेत्यांचे मनस्वी अभिनंदन।।

    ReplyDelete
  3. "पावसाची सर" ही कविता छान जमलीय; प्रथम क्रमांकाबद्दल मन:पूर्वक अभिनंदन

    ReplyDelete
  4. पावसाची सर आवडली; मन:पूर्वक अभिनंदन ! - सुधीर मोघे

    ReplyDelete
  5. पावसाची सर आवडली; मन:पूर्वक अभिनंदन ! - सुधीर मोघे

    ReplyDelete
  6. सर्व कविता वाचून छान वाटले. काविमित्रांचे अभिनंदन. व लेखन शुभेच्छा.
    कविमित्रांच्या कविता - काव्यानंद प्रतिष्ठान च्या "काव्य-कट्टा "उपक्रमातून वाचकांच्या पर्यंत येत आहेत , या स्तुत्य -उपक्रमाबद्दल .काव्यानंद चे श्री.सुनील खंडेलवाल व विवेक पोटे या मित्रांचे अभिनंदन.

    ReplyDelete